माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल, कारेगाव येथे दिवाळी पार्टी व दीपोत्सवाचे अनोखे आयोजन

Dhak Lekhanicha
0

 माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल, कारेगाव येथे दिवाळी पार्टी व दीपोत्सवाचे अनोखे आयोजन


शिरूर (जि. पुणे) : प्रतिनिधी सुदर्शन दरेकर 

कारेगाव, ता. शिरूर येथील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल मध्ये दिवाळी निमित्त दीपोत्सव आणि अनोख्या दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माईलस्टोन एज्युकेशन नेटवर्कचे संस्थापक सेक्रेटरी व कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे यांनी दिली.

भारतीय सण उत्सवाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, या हेतूने  संस्था नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंद घेता यावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा  या उद्देशाने संस्थेच्या कारेगाव येथील शाखेमध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश कंदील, भेटकार्ड तसेच मिठाई शिक्षकांना देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात दिवाळी पार्टीचा आनंद घेतला असल्याचे संस्थेच्या संचालिका तथा 'माईलस्टोन' च्या प्रिन्सिपल सौ कांचन  सोनवणे पाटील मॅडम त्यांनी सांगितले.


शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात माती पासून तयार केलेले किल्ले, रंगीबेरंगी आकाश कंदील, विविध रंगाने सजवलेल्या पणत्या आणि रांगोळी काढून संपूर्ण शाळेचा परिसर सुशोभित केला होता.

संस्थेचे कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे यांनी याप्रसंगी वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन  आणि भाऊबीज या सणांचे महत्त्व सांगितले. तसेच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना लाडू,चिवडा, बालुशाही, चकली, शंकरपाळी, बाकरवडी, सोनपापडी आधी फराळाचे वाटप करून मोठ्या उत्साहात 'दिवाळी पार्टी' साजरी करण्यात आल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ मीनाताई गवारे यांनी सांगितले.

संस्थेच्या वतीने स्टाफ मधील सर्व महिला भगिनींना सौ मीनाताई गवारे यांच्या हस्ते साड्या, मिठाई आणि दिवाळी पणत्या आदी भेट वस्तूंचे वाटप करून भाऊबीजेची भेट देऊन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

 भारतीय सणांमधील प्रमुख सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावे तसेच सर्व धर्मसमभाव जोपासण्याची वृत्ती बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावी या उद्देशाने माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल, कारेगाव या शाळेने राबविलेला दिवाळी पार्टीचा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि उल्लेखनीय असून परिसरात अशाप्रकारे अनोखे उपक्रम राबवणारी 'माईलस्टोन स्कुल' ही एकमेव शाळा असल्याचे मत सौ मीनाताई गवारे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. 

याप्रसंगी उपस्थित  मान्यवरांसह सर्वांनी एकत्रित दिवाळी फराळाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!